सोनोग्राफी रिपोर्टमधल्या शब्दांचा अर्थ
आधी शेवटचा भाग वाचा: Impression. खड्यासाठी चार गोष्टी पाहा: calculus हा शब्द, मिमीमधला आकार, जागा, आणि सूज (hydronephrosis, dilated).
डॉक्टर: डॉ. सत्यवान गडदे, BAMS, MBA


सोनोग्राफी रिपोर्ट समजून घ्या
सोनोग्राफी रिपोर्ट नमुना
Gall bladder is well distended. A measuring is seen in its lumen, with . . .
सोनोग्राफी रिपोर्ट नमुना
Left kidney is normal in size. A measuring is seen in the , with . .
Calculus खडा
Calculus म्हणजे खडा. Calculi म्हणजे एकापेक्षा जास्त खडे.
8 mm आकार
खड्याचा आकार. खडा कुठे आहे, काही अडले आहे का आणि तुमचा त्रास, हेही महत्त्वाचे.
Posterior acoustic shadowing खड्यामागची सावली
खड्यातून आवाजाच्या लहरी पार होत नाहीत, म्हणून मागे काळी सावली दिसते. यावरून खडा, गाळ आणि पॉलिप यांतला फरक कळतो.
Wall thickness 2.4 mm भिंतीची जाडी
पित्ताशयाच्या भिंतीची जाडी. साधारण ३ मिमीपर्यंत नॉर्मल. जास्त असेल तर सूज असू शकते.
CBD not dilated पित्तनलिका
CBD म्हणजे पित्त आतड्यात नेणारी मुख्य नळी. Not dilated म्हणजे ती फुगलेली नाही.
No hydronephrosis मूत्रपिंडाला सूज
लघवी अडल्यामुळे मूत्रपिंडाला येणारी सूज म्हणजे Hydronephrosis. No म्हणजे तशी सूज दिसत नाही.
Lower calyx मूत्रपिंडाचा खालचा कप्पा
मूत्रपिंडाच्या आतला, खालच्या बाजूचा कप्पा. इथे खडा बराच काळ न दुखता राहू शकतो.
सोनोग्राफी रिपोर्ट कसा वाचावा?
- नाव, वय आणि तारीख पाहा.
- शेवटी जा: "Impression". तो सारांश असतो.
- प्रत्येक खड्याचा आकार (mm) आणि जागा शोधा.
- "Hydronephrosis", "dilated", "thickened" हे शब्द शोधा: कुठे सूज किंवा अडथळा आहे ते सांगतात.
- "Right" म्हणजे उजवा, "left" म्हणजे डावा, "bilateral" म्हणजे दोन्ही बाजू.
- मागच्या रिपोर्टमधल्या आकाराशी तुलना करा.
डॉक्टर रिपोर्टसोबत तुमचा आधीचा त्रासही पाहतात.
पित्ताशयाचे शब्द
- Cholelithiasis
- पित्ताशयात खडे
- Calculus / calculi
- खडा / खडे
- Sludge
- घट्ट पित्ताचा गाळ, अजून खडा नाही; हळू सरकतो, सावली पडत नाही
- Polyp
- भिंतीवरची लहान वाढ; हलत नाही, सावली पडत नाही
- Wall thickness
- भिंतीची जाडी, उपाशी पोटी ३ मिमीपेक्षा कमी नेहमीची
- Contracted
- आकुंचन पावलेले, अनेकदा जेवल्यामुळे
- Distended
- भरलेले, उपाशी पोटी नॉर्मल
- CBD
- पित्त आतड्यात नेणारी मुख्य नळी. साधारण ६ मिमीपर्यंत
- IHBR
- यकृताच्या आतल्या पित्ताच्या बारीक नळ्या
- Pericholecystic fluid
- पित्ताशयाभोवती पाणी
- Cholecystitis
- पित्ताशयाला सूज
मूत्रपिंड आणि नळीचे शब्द
- Calculus / calculi
- खडा / खडे
- Calyx (upper, mid, lower pole)
- मूत्रपिंडातला कप्पा, इथे खडा पडून राहू शकतो
- Renal pelvis
- मूत्रपिंडात लघवी गोळा होते ती जागा
- PUJ (pelviureteric junction)
- मूत्रपिंडाखाली नळीची अरुंद सुरुवात
- Ureter (upper, mid, lower)
- मूत्रपिंडापासून मूत्राशयापर्यंतची नळी
- VUJ (vesicoureteric junction)
- नळीचा अरुंद शेवट, जिथे ती मूत्राशयात जाते
- KUB
- Kidney, ureter, bladder: लघवीचा पूर्ण मार्ग
- Hydronephrosis
- लघवी नीट निघत नसल्यामुळे मूत्रपिंडाला आलेली सूज
- Hydroureter
- अडथळ्याच्या वर नळीला आलेली सूज
- Echogenic focus
- चमकदार ठिपका. तो खडा असू शकतो किंवा नसू शकतो
- Posterior acoustic shadowing
- खड्यामागची काळी सावली, जिथे आवाज पोहोचत नाही
- Bilateral
- दोन्ही बाजूंना
- Simple cyst
- मूत्रपिंडातली पाण्याची लहान गाठ, वयानुसार सर्रास दिसते
- Post-void residue (PVR)
- लघवी केल्यावर मूत्राशयात उरलेली लघवी
Hydronephrosis: mild, moderate, severe म्हणजे काय?
Hydronephrosis म्हणजे लघवी नीट निघत नसल्यामुळे मूत्रपिंडाला येणारी सूज. खडा हे एक कारण; गरोदरपण, वाढलेली प्रोस्टेट आणि संसर्ग ही इतर कारणे. श्रेणीवरून सूज किती आहे ते कळते.
- Mild
- मूत्रपिंडातली लघवी गोळा होणारी जागा थोडी रुंद
- Moderate
- आतले कप्पेही रुंद
- Severe
- कप्पे खूप रुंद, आणि मूत्रपिंडाचा काम करणारा भाग पातळ दिसतो
रिपोर्ट त्याच दिवशी डॉक्टरांना दाखवा. ताप, न थांबणाऱ्या उलट्या किंवा लघवी बंद असेल तर लगेच हॉस्पिटलला जा.
उदाहरणे आणि अर्थ
| रिपोर्ट | अर्थ |
|---|---|
| 4 mm calculus in lower calyx of left kidney. No hydronephrosis. | डाव्या मूत्रपिंडाच्या खालच्या कप्प्यात ४ मिमीचा खडा. मूत्रपिंडाला सूज नाही. |
| 6 mm calculus at right VUJ with mild hydroureteronephrosis. | उजव्या नळीच्या शेवटी, मूत्राशयाजवळ ६ मिमीचा खडा. वरची नळी आणि मूत्रपिंडाला थोडी सूज. |
| 8 mm calculus at left PUJ with moderate hydronephrosis. | डावी नळी जिथे सुरू होते तिथे ८ मिमीचा खडा. मूत्रपिंडाला सूज आहे. त्याच दिवशी डॉक्टरांना दाखवा. |
| Few tiny concretions in both kidneys. | दोन्ही मूत्रपिंडांत अगदी बारीक कण. |
| Multiple calculi in GB, largest 9 mm. Wall thickness 2.5 mm. | पित्ताशयात अनेक खडे, सर्वात मोठा ९ मिमी. भिंतीची जाडी नॉर्मल. |
| GB sludge noted. No calculus. | पित्ताशयात घट्ट पित्ताचा गाळ, खडा नाही. |
| 5 mm non-mobile, non-shadowing lesion: polyp. | भिंतीवर न हलणारी ५ मिमीची वाढ: polyp, खडा नाही. |
| CBD not dilated. | पित्तनलिका फुगलेली नाही. |
या नमुना ओळी आहेत.
सोनोग्राफीआधी
- पित्ताशय: सेंटर सांगेल तसे उपाशी या (अनेकदा ६ ते ८ तास). जेवल्यावर पित्ताशय आकुंचन पावते आणि खडा दिसायचा राहू शकतो.
- मूत्रपिंड आणि मूत्राशय: पाणी पिऊन, लघवी भरलेली असताना या.
- मागचा रिपोर्ट न्या, म्हणजे आकाराची तुलना होते.
- कुठे दुखते ते सेंटरला सांगा.
सीटी कधी लागते?
लहान खडा किंवा नळीच्या मधला खडा सोनोग्राफीत दिसायचा राहू शकतो. औषध न देता केलेल्या सीटीत (NCCT KUB) आकार, जागा आणि अडथळा जास्त स्पष्ट दिसतो. यात किरण असतात, म्हणून डॉक्टरांनी सांगितल्यावरच करतात.
लगेच हॉस्पिटलला जा
भेटीची वाट पाहू नका, जर:
- दुखण्यासोबत ताप, थंडी किंवा हुडहुडी असेल
- डोळे किंवा त्वचा पिवळी, लघवी चहासारखी झाली असेल
- उलट्या थांबत नसतील
- लघवी होत नसेल, किंवा थेंब थेंब होत असेल
- लघवीतून खूप रक्त जात असेल
- इतके दुखत असेल की बसता किंवा उभे राहता येत नाही
प्रश्न
Calculus in kidney म्हणजे काय?
मूत्रपिंडात खडा. Calculi म्हणजे एकापेक्षा जास्त खडे. mm मधला आकडा म्हणजे आकार.
Hydronephrosis चा मराठीत अर्थ काय?
लघवी नीट निघत नसल्यामुळे मूत्रपिंडाला आलेली सूज. नळीतला खडा हे एक कारण. त्याच्या mild, moderate, severe अशा श्रेणी असतात.
VUJ calculus म्हणजे काय?
नळी जिथे मूत्राशयात जाते त्या अरुंद जागी (vesicoureteric junction) असलेला खडा. ओटीपोटात आणि जांघेत दुखू शकते, आणि पुन्हा पुन्हा लघवीला लागते.
PUJ calculus म्हणजे काय?
मूत्रपिंड आणि नळी जिथे जोडतात त्या जागी (pelviureteric junction) असलेला खडा. तो लघवी अडवू शकतो आणि मूत्रपिंडाला सूज येऊ शकते.
Echogenic focus म्हणजे काय?
चित्रात दिसणारा चमकदार ठिपका. मागे काळी सावली असेल तर बहुतेकदा तो खडा असतो. सावली नसेल तर दुसरे काही असू शकते.
Posterior acoustic shadowing म्हणजे काय?
खड्यामागची काळी सावली. यावरून खडा, गाळ आणि polyp यांतला फरक कळतो.
सोनोग्राफीत खडा दिसायचा राहू शकतो का?
हो. लहान खडा किंवा नळीच्या मधला खडा राहू शकतो. डॉक्टर मग सीटी सांगू शकतात.
Concretion म्हणजे खडाच का?
Concretion म्हणजे कणांचा अगदी लहान समूह. तो तसाच राहू शकतो, निघून जाऊ शकतो किंवा वाढू शकतो, म्हणून पाणी आणि पुन्हा सोनोग्राफी सांगतात.
रिपोर्ट WhatsApp वर पाठवू का?
हो, 77988 79979 वर पाठवा. आम्ही तो पाहतो, त्रास काय आहे ते सांगतो आणि क्लिनिकला यायला सांगतो.
अपॉइंटमेंट घ्या
डॉ. सत्यवान गडदे
रोज, फक्त वेळ ठरवून: सकाळी १० ते दुपारी २ आणि संध्याकाळी ६ ते रात्री १०
अद्ययावत: २३ नोव्हेंबर २०२६. संदर्भ: Hydronephrosis, NHS; Ultrasound of the gallbladder: a scoping review, Life 2025; Guidelines on Urolithiasis 2022, European Association of Urology; Gallstones, NIDDK.
